पुरुष - सुसंस्कृत का विकृत
विषया वरुन आशय कळला असेलच.
परवा असेच एका मोठ्या मॉल मध्ये काही खरेदी करायला गेलो, एक प्रसंग खुप विचार करायला लावून गेला म्हणून ह्या लिखाणाचे प्रयोजन. एक पुरुष त्याच्या कुटुंबा बरोबर खरेदी करायला आला होता ,तिथे काही सेल्स गर्ल्स होत्या लहान होत्या वयाने उपजिवीके साठी नौकरी करत होत्या. हा पुरुष त्यांच्या बाह्य अंगाकडे खूप वाईट नजरेने पाहत होता स्वतःच्या बायकोला खरेदी मध्ये गुंतवून. ह्या पुरुषाला बेदम मारावे का त्याची कीव करावी हेच कळत नव्हते. ज्याला आपण उचभ्रु शिकलेला चांगल्या घरातला वगैरे म्हणतो अश्या पुरुषाचा हा भयावह चेहरा.
खूप प्रश्न मनात चाटून गेले त्याने असे का केले असेल ? त्याची अशी इतकी गलिच्छ मानसिकता का असेल ? आणि बरेच काही , त्या बिचार्या मुलींचे काय चुकले लहान होत्या गरिबीचे चटके सोसत काही पैसे कमावत होत्या कोणताही आधार नाही त्यांचे कोणी ऐकणार नाही , म्हणून का हे लोक असे शेफ़ारले आहेत.
आपल्या देशात स्त्री ला अनन्य साधारण महत्त्व आहे आणि हीच स्त्री आजकाल अशी इतकी असुरक्षित आहे
का आपल्या कडे तिला हवा तसा सन्मान मिळत नाही ? का ही पुरुषांची अशी वासनिक मानसिकता पदोपदी स्त्रियांना सहन करावी लागते.
एखाद्या स्त्री चा पदर पडला तर माझी बहीण किंवा आई ह्या नात्याने तिला तो ठीक करायला सांगणे हा सुसंकृत शिष्टाचार , त्या कडे गलिच्छ नजरेने बघणे म्हणजे केवळ संस्कारांचा अभाव.
आजकाल तर मैत्रीच्या पवित्र नात्यात ही वासना आणि स्वार्थ दडला आहे , एखादी स्त्री समजा एखादया पुरुषाकडे आधार किंवा मदत मागते तर ही संधी नाही तर जवाबदारी आहे , त्याचा गैरफायदा घेणे म्हणजे अक्षम्य पाप आहे .
स्त्री पुरुष समानता आपण म्हणतो, तसे नौकऱ्या ही मिळतात माता भगिनी नित्य नियमाने त्यांचे कर्तव्य पूर्ण करतात , पण तिथे ही त्या सुरक्षित नाहीत. पन्नाशीचा एखादा वरिष्ठ अगदी नवीन रुजू झालेल्या एखाद्या विशीतल्या तरुणीवर वाईट नजर ठेऊन तिचा गैरफायदा घेण्याच्या प्रयत्नात असतो . ह्या अश्या विकृतीला काय म्हणावे नेमके.
स्त्री साठी तिच्या आजूबाजूचे पुरुष मग ते वडील असो भाऊ असो किंवा मित्र असो विश्वासातले हक्काचे असतात तिथे ही तिला आज धोका अविश्वास ह्याला सामोरे जावे लागते आहे
का नाही प्रत्येक आई बहीण तिच्या मुलाला किंवा भावाला असे तयार करत की तो परस्त्री कडे माता भगिनी ह्याच रूपात बघेल आणि त्यांची जवाबदारी घेऊन त्यांना त्यांचा सन्मानाने वागवेल. शिवाजी निर्माण होण्यासाठी पाहिले जिजाऊ तर जन्माला आल्या पाहिजेत.
मला मान्य आहे ह्या समाजात जसे वाईट पुरुष तसे काही वाईट स्त्रिया ही आहेत , व्यभिचारी किंवा विश्वासघात करणाऱ्या. खोटे आणि अप्रामाणिक वागणाऱ्या. पण प्रत्येक समाजात चांगले वाईट लोक किंवा अनुभव असतात , आपण स्वतःला किती सुसंकृत प्रामाणिक आणि खरे करू शकू ह्यावर त्या समाजाचा समतोल अवलंबून असतो
परस्त्री माते सामान हे काय केवळ पुस्तकातच राहणार का ? आपली मैत्रीण, सहकर्मचारी , बहीण , बायको , आई अश्या कित्येक स्वरूपात स्त्रिया आपल्या आजूबाजूला वावरत असतात , त्यांचा सन्मान करणे आणि त्यांना सुरक्षिततेची भावना देणे हे आपले आद्य कर्तव्य आहे.
समाज खराब आहे अलीकडे सगळे वाईट होत चालले आहे ,हे घरी बसून म्हणण्या पेक्षा स्वतःमध्ये आणि आजूबाजूच्या वातावरणा मध्ये बदल घडवणे किंवा प्रभोधन करणे हे आपलेच काम आहे कोणी बाहेरचा येऊन आपला ढासळलेला समाज नीट नाही करू शकणार.
प्रत्येक पुरुषाने स्वतःला सुसंस्कृत करायला हवे विकृत नव्हे , स्त्री ही आपल्या आयुष्याची सहचारिणी किंवा अविभाज्य घटक आहे ह्या दृष्टिकोनातून तिच्या कडे पाहायला हवे . ती उपभोगाची किंवा वापरण्याची गोष्ट नाही हे प्रत्येक पुरुषाने स्वतःला आणि दुसऱ्याला ही सांगायला हवे आणि तसे करायला भाग पडायला हवे.
आपण सगळे मिळून महारांजाच्या सुराज्य आणि स्वराज्याचे स्वप्न खऱ्या अर्थाने साकार करूयात.
शुभम भवतु
अद्वैत