Thursday, June 8, 2017

राग - खरेच येतो का आपण आणतो

परवा असेच एका मित्राशी खूप काळाने बोलणे झाले , फार वैतागला होता रागात होता. त्याच्या रागाची तशी बरीच कारणे होती पण त्याच्याशी बोलताना किंवा त्याला समजून सांगताना काही विचार मनात डोकावून गेले.
आपण प्रत्येक जण आयुष्यात चिडतो, रागावतो.  साधारण राग हा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भागच आहे असे समजून वागत असतो. पण त्याची नेमकी करणे काय आहेत किंवा राग हा येत नसतो तो आपण आणत असतो हेच कदाचित आपण समजून घेत नाही
माझ्या मते समजा रागाचे  वर्गीकरण केले तर मुख्यतः दोन स्वरूपात रागाची परिस्तिथी आपण ठरवू शकतो.
पहिले म्हणजे आपण सहसा आपल्या हक्काच्या व्यक्तीवर किंवा ज्याला आपण गृहीत धरले आहे त्याच व्यक्तीवर रागावतो, कदाचित ह्याच्यावर  चिडलो तरी हा कुठे जाणार आहे सोडून, हि भावना असेल मनात मागे कुठेतरी.  आपण कार्यालयात आपल्या वरिष्ठांवर कधी चिडत नाही कारण तिथे आपली नौकरी  जाऊ शकते ह्याची भीती असते किंवा अशी कोणती व्यक्ती जिच्या जाण्याने आपल्याला त्रास होऊ शकतो त्याच्यावर आपण सहसा चिडत नाही म्हणजे थोडक्यात जिथे कोणती तरी भीती असते तिथे आपण आपल्या रागावर नियंत्रण ठेवतो , समजा तेच नियंत्रण आपण भीतीपोटी न ठेवता प्रेमापोटी ठेवले तर कदाचित आयुष्यातले अर्धे त्रास किंवा विवंचना कमी होतील.
आणि दुसरे म्हणजे आपल्या हातून काही चूक झाली असेल आणि ती समोरच्या व्यक्ती ला कळू नये किंवा त्यावर स्पष्टीकरण द्यावे लागू नये म्हणून पहिलेच स्वतःहून आरडाओरड करायची म्हणजे पुढला व्यक्ती त्यापलीकडे काही बोलूच शकत नाही.  एखाद्यापासून काही लपवावे लागत असेल किंवा सारवासारव करावी लागत असेल तर अशी कर्म कधी करू नये म्हणजे रागावर आपोआप नियंत्रण राहील.
राग हा आपला शत्रू आहे हे सर्वांना ठाऊक असते पण त्यावर नियंत्रण ठेवणे जमत नाही आणि नात्यामध्ये कटुता निर्माण होते .
रागावून बोलू नये ह्याचा अर्थ हा नव्हे कि तोंडदेखले गोड  गोड बोलायचे . जे बोलायचे ते शांतपणे दुसऱ्याचा विचार करून प्रामाणिकपणे आणि खरे बोलावे. खरेपणा आणि प्रामाणिक पणा  ह्यातून आयुष्यातल्या  बहुतांश समस्यांचे निर्मूलन होऊ शकते आणि मनःशांती लाभते.
आपला अट्टहास सोडून दुसऱ्याच्या भावनेचा आणि मनाचा विचार करून बोलले किंवा वागले तर एखाद्याशी सुसंवाद साधणे इतके हि कठीण नाही,केवळ एक प्रामाणिक प्रयत्न्न करण्याची गरज आहे.

शुभम भवतु
अद्वैत

Friday, February 24, 2017


संस्कारांना परिस्तिथीचा अपवाद नसावा हे माझे प्रांजळ मत आहे .
सोयीस्कररित्या वागणे ,बोलणे , विचार आणि आचार बदलणे हे तत्व नसलेल्या हरलेल्या आणि ढोंगी माणसाचे लक्षण आहे असे मला वाटते .
परिस्तिथीचा टेकू घेऊन खोटे वागणे, गरजेनुसार लोकांना वापरून घेणे ,हवी तेव्हा तत्वांशी तडजोड करून युती करणे हे म्हणजे धाधान्त खोटे आणि अप्पलपोटी माणसाचे लक्षण आहे .
आपल्या वागण्याला परिस्तिथीचे कारण देणे आणि त्याचे उदात्तीकरण करून संस्कार सोडणे हे सुसंस्कृत माणसाचे लक्षण नक्कीच नाही .
परिस्तिथी बरी-वाईट हा तर नियतीचा खेळ आहे, किन्तु त्यामध्ये स्वतःच्या विवेकबुद्धी ला हरवून दुतोंडी वागणे हे मनुष्याचे नाही तर पशूचे लक्षण आहे .
खरा मनुष्य कोणत्याही परिस्तिथी मध्ये आपल्या तत्वांना , संस्कारांना किंवा विचारांना मुरड घालत नाही , त्यामुळे परिस्थिती नव्हे तर मनुष्याचा दुबळेपणा त्याला असंस्कृत बनवतो.
आपला प्रदेश, आजूबाजूची परिस्थिती किंवा आपला काळ ह्याने आपले वागणे नाही ठरवावे तर ते आपल्या मूलभूत संसकाराने आणि विवेक बुद्धी ने ठरवावे .
कर्माचा खेळ खूप निराळा आहे जे पेरतो ते नक्की कधीतरी परत येते , त्यामुळे आपल्या चुकीच्या आणि खोट्या वागण्याला परिस्तिथी, नशीब असल्या दुबळ्या शब्दांचा आधार देण्यापेक्षा संस्कार आणि तत्वांचा आधार देऊन सक्षम आणि सुसंस्कृत समाज तयार करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे .

शुभम भवतु

अद्वैत