Thursday, June 8, 2017

राग - खरेच येतो का आपण आणतो

परवा असेच एका मित्राशी खूप काळाने बोलणे झाले , फार वैतागला होता रागात होता. त्याच्या रागाची तशी बरीच कारणे होती पण त्याच्याशी बोलताना किंवा त्याला समजून सांगताना काही विचार मनात डोकावून गेले.
आपण प्रत्येक जण आयुष्यात चिडतो, रागावतो.  साधारण राग हा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भागच आहे असे समजून वागत असतो. पण त्याची नेमकी करणे काय आहेत किंवा राग हा येत नसतो तो आपण आणत असतो हेच कदाचित आपण समजून घेत नाही
माझ्या मते समजा रागाचे  वर्गीकरण केले तर मुख्यतः दोन स्वरूपात रागाची परिस्तिथी आपण ठरवू शकतो.
पहिले म्हणजे आपण सहसा आपल्या हक्काच्या व्यक्तीवर किंवा ज्याला आपण गृहीत धरले आहे त्याच व्यक्तीवर रागावतो, कदाचित ह्याच्यावर  चिडलो तरी हा कुठे जाणार आहे सोडून, हि भावना असेल मनात मागे कुठेतरी.  आपण कार्यालयात आपल्या वरिष्ठांवर कधी चिडत नाही कारण तिथे आपली नौकरी  जाऊ शकते ह्याची भीती असते किंवा अशी कोणती व्यक्ती जिच्या जाण्याने आपल्याला त्रास होऊ शकतो त्याच्यावर आपण सहसा चिडत नाही म्हणजे थोडक्यात जिथे कोणती तरी भीती असते तिथे आपण आपल्या रागावर नियंत्रण ठेवतो , समजा तेच नियंत्रण आपण भीतीपोटी न ठेवता प्रेमापोटी ठेवले तर कदाचित आयुष्यातले अर्धे त्रास किंवा विवंचना कमी होतील.
आणि दुसरे म्हणजे आपल्या हातून काही चूक झाली असेल आणि ती समोरच्या व्यक्ती ला कळू नये किंवा त्यावर स्पष्टीकरण द्यावे लागू नये म्हणून पहिलेच स्वतःहून आरडाओरड करायची म्हणजे पुढला व्यक्ती त्यापलीकडे काही बोलूच शकत नाही.  एखाद्यापासून काही लपवावे लागत असेल किंवा सारवासारव करावी लागत असेल तर अशी कर्म कधी करू नये म्हणजे रागावर आपोआप नियंत्रण राहील.
राग हा आपला शत्रू आहे हे सर्वांना ठाऊक असते पण त्यावर नियंत्रण ठेवणे जमत नाही आणि नात्यामध्ये कटुता निर्माण होते .
रागावून बोलू नये ह्याचा अर्थ हा नव्हे कि तोंडदेखले गोड  गोड बोलायचे . जे बोलायचे ते शांतपणे दुसऱ्याचा विचार करून प्रामाणिकपणे आणि खरे बोलावे. खरेपणा आणि प्रामाणिक पणा  ह्यातून आयुष्यातल्या  बहुतांश समस्यांचे निर्मूलन होऊ शकते आणि मनःशांती लाभते.
आपला अट्टहास सोडून दुसऱ्याच्या भावनेचा आणि मनाचा विचार करून बोलले किंवा वागले तर एखाद्याशी सुसंवाद साधणे इतके हि कठीण नाही,केवळ एक प्रामाणिक प्रयत्न्न करण्याची गरज आहे.

शुभम भवतु
अद्वैत

Friday, February 24, 2017


संस्कारांना परिस्तिथीचा अपवाद नसावा हे माझे प्रांजळ मत आहे .
सोयीस्कररित्या वागणे ,बोलणे , विचार आणि आचार बदलणे हे तत्व नसलेल्या हरलेल्या आणि ढोंगी माणसाचे लक्षण आहे असे मला वाटते .
परिस्तिथीचा टेकू घेऊन खोटे वागणे, गरजेनुसार लोकांना वापरून घेणे ,हवी तेव्हा तत्वांशी तडजोड करून युती करणे हे म्हणजे धाधान्त खोटे आणि अप्पलपोटी माणसाचे लक्षण आहे .
आपल्या वागण्याला परिस्तिथीचे कारण देणे आणि त्याचे उदात्तीकरण करून संस्कार सोडणे हे सुसंस्कृत माणसाचे लक्षण नक्कीच नाही .
परिस्तिथी बरी-वाईट हा तर नियतीचा खेळ आहे, किन्तु त्यामध्ये स्वतःच्या विवेकबुद्धी ला हरवून दुतोंडी वागणे हे मनुष्याचे नाही तर पशूचे लक्षण आहे .
खरा मनुष्य कोणत्याही परिस्तिथी मध्ये आपल्या तत्वांना , संस्कारांना किंवा विचारांना मुरड घालत नाही , त्यामुळे परिस्थिती नव्हे तर मनुष्याचा दुबळेपणा त्याला असंस्कृत बनवतो.
आपला प्रदेश, आजूबाजूची परिस्थिती किंवा आपला काळ ह्याने आपले वागणे नाही ठरवावे तर ते आपल्या मूलभूत संसकाराने आणि विवेक बुद्धी ने ठरवावे .
कर्माचा खेळ खूप निराळा आहे जे पेरतो ते नक्की कधीतरी परत येते , त्यामुळे आपल्या चुकीच्या आणि खोट्या वागण्याला परिस्तिथी, नशीब असल्या दुबळ्या शब्दांचा आधार देण्यापेक्षा संस्कार आणि तत्वांचा आधार देऊन सक्षम आणि सुसंस्कृत समाज तयार करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे .

शुभम भवतु

अद्वैत 

Sunday, September 25, 2016

समाजाची मोर्चेबांधणी

सध्या सगळ्यात जास्त चर्चेचा विषय असलेला मराठा समाजाचा मूक मोर्चा , इतक्या मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय सामील होऊनही शांततेचा भंग न करता सुनियोजित पद्धतीने पार पडलेल्या ह्या मोर्चाचे कौतुक नक्कीच करावे. परंतु ज्या कारणांसाठी हा सगळा उहापोह केला ते मुद्दे मात्र फारच चुकीचे किंवा अर्थहीन वाटतात. आरक्षण,छुवाछूत कायदा,कोपर्डी प्रकरण असे काही मुद्दे ह्यात होते. 
आता आरक्षणा विषयी आपण कित्येकदा वेगवेगळ्या समाजाच्या समस्या अधोरेखित करताना बोलतच असतो.
माझे व्ययक्तिक मत कोणत्याही समाजाला आरक्षण नको हेच आहे आणि ते ठाम आहे.. आता ह्यात हि आरक्षण असावे तर ते केवळ आर्थिक पातळीवर मग ते कोणत्याही जाती धर्माचे असावे. कारण गरीब लोक हे सर्व जाती धर्मात आहेत केवळ मराठा, गुजर, पटेल अश्या काही समाजात नाही.. ब्राम्हण समाजात ही आहेतच कि गरजू कनवाळू लोक. प्रत्येक समाजाने कष्ट करावे आणि आपले कर्तृत्व सिद्ध करावे जिथे आर्थिक अडचण येते तिथेच आरक्षण द्यावे. आता मराठा शेतकरी आत्महत्या करतो हे वाक्यच किती बालिश आहे. शेतकरी आत्महत्या करतो असे का नाही , का केवळ शेतकरी मराठा असला तरच तो आत्महत्या करणार आणि बाकी जाती धर्मात सगळे सुकाळ आहे तर तसे नाही ज्या राजकारण्यांना आज समाजाचा कळवळा आला त्यांनी गेले २५-३० वर्षे त्या समाजाचा उद्धार करण्यासाठी असे कितीसे पर्यंत केले आणि त्यात किती आत्महत्या थांबवल्या तेव्हा तर त्यांचे लक्ष धरणात स्वतःच्या मूत्राचा साठा करून पाणी वाढवणे हा होता असो तो मुद्दा नको.
कोपर्डी प्रकारण म्हणावे तर तो कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आहे कोणा एका समाजाचा नाही. उद्या उठून हि घटना कोणत्याही जाती धर्मात घडली तरी त्याला योग्य ती शिक्षा हवीच. आणि त्यासाठी असलेले काही कायदे किंवा नवीन करावे लागणारे कायदे हे योग्य रितेने वापरावे आणि शासनाने तसे करावे.
आणि छुवाछूत कायदा , हा तसा कालबाह्य आहे आणि आजही समाजा समाजातल्या कोणत्याही जाती धर्मातल्या कोणत्याही लोकांवर असा अन्याय होत असेल तर तो अक्षरशः चुकीचा आहे आणि त्याला योग्य ते शासन हे हवेच
मुळात हे सगळे मुद्दे कोणा एका जाती धर्माचे होऊच नाही शकत, आता काही पुढारी आणि राजकारणी त्याला आपल्या स्वार्था साठी वापरून घेऊन लोकांची दिशाभूल करतात हे अत्यंत्य दयनीय आहे. पण आपण कितपत आंधळे पणाने ह्याचे अनुकरण करायचे हा सर्वस्वी आपला प्रश्न आहे.
सर्वात महत्वाचे, ज्या माता जिजाऊ च्या नावाने हा सगळं उहापोह करतात त्या मातेने शिवबाला कधीही स्वराज्याची भीक मुघलांकडे माग अशी शिकवण दिली नाही. कोणत्याही जाती धर्माचे राजकारण कर आणि स्वतःचा समाज सक्षम कर असे कधीही जिजाऊ नि शिकवले नाही आणि शिवरायांनी कधीही तसे केले नाही . शिवरायांच्या स्वराज्या मध्ये सर्व जात धर्म एकसमान होते. ज्या शिवरायांचे आपण अनुकरण करू इच्छितो ते कर्तृत्ववान होते.स्वबळावर कष्ट करून तत्वनिष्ठ राजकारण करून हे स्वराज्य स्थापन केले. त्यांच्या नखांची हि सर आजकालच्या कोणत्याही राजकारण्याला नाही आणि त्यांचे अंध अनुकरण करणाऱ्या ह्या निर्दिस्त समाजाला हि नाही
हे असे शक्तिप्रदर्शन करून मराठा समाजाने आपली एकजूट आणि शक्ती दाखवली आता तीच शक्ती आणि क्षमता ह्या पूर्ण समाजाच्या भल्या साठी आणि माणुसकी साठी वापरली तर ह्या स्वराज्यात कोणालाही कशासाठी ही आरक्षण घ्यावे लागणार नाही.
जात आणि धर्म हा एकच आणि तो म्हणजे माणुसकी ,जसा महारांजाचा होता , गरजू लोक मग ते कोणत्याही समाजाचे आणि जातीचे असो सामान आहेत आणि त्यांची मदत आणि त्यांना आधार हाच खरा सुराज्याचा गुरुमंत्र.. आपल्या पुढल्या पिढिला योग्य ते संदेश देऊयात. हे असे जातीयवादाचे बीज आता नको पसरुयात, ह्याने समाजचे नुकसानच होते असा आपला इतिहास आपल्याला साक्ष आहे. हे असे प्रत्येक समाजाने उठून आम्हाला हे हवे ते हवे असे केले तर समाज समक्ष नाही तर विघटित होईल आणि नेहमीप्रमाणे बाह्य शक्ती आणि राजकारणी त्याचा गैरवापर करतील
सर्वांनी मिळून एकत्र येऊन समाजाला सक्षम करूयात सर्व रंजले गांजलेल्याना गरजू लोकांना मदत करून त्यांना त्यांच्या पायावर उभे करूयात सर्व जण एकत्र चालूयात जातीधर्म असे काही नको. आणि हीच शिकावण आपण आपल्या पुढल्या पिढीला देऊ जेणेकरून येणारा समाज हा खूप प्रगतिशील माणूसकीने वागणारा आणि खऱ्या अर्थाने सुसंस्कृत असेल. आणि ह्याच अश्याच सुराज्याचे आणि स्वराज्याचे स्वप्न महाराजांनी पहिले आहे ते आपण सर्व एकत्र आलो तरच पूर्ण होईल.

शुभम भवतु
अद्वैत




 

Friday, September 2, 2016

समाज - समंजस  का  असमंजस

इतक्यातच काही बातम्या वाचनात आणि ऐकण्यात आल्या , जन्माष्टमीच्या दिवशी ९ थरांची दहीहंडी , गणेशोस्तवात वाढणारा विभत्सपणा , रिक्षेवाल्यांचा संप आणि बरेच काही. नेहमी प्रमाणे बऱ्याच गोष्टिचा विचार लावून गेल्या ह्या बातम्या.
समाजात होणाऱ्या ह्या अश्या गोष्टी म्हणजे निर्दिस्त समाजाला लागलेली कीड , हि काढणे जास्त महत्वाचे का मोदी जो विकासाचा शिवधनुष्य पेलवण्याचा प्रयन्त करतात तो महत्वाचा. ह्यावर आपण कायम चर्चा करतो टीका करतो , पण कदाचित ह्या मागचे नेमके कारण जाणून घेऊन त्यावर उपाययोजना होताना दिसत नाही.
ह्या सगळ्या बातम्या वाचल्या कि कुठेतरी असे जाणवते कि हे बाकी काही नसून  कायम चालत आलेले अतिशय घाण राजकारण आहे ज्यात समाजकारणाला काही हि स्थान नाही , आणि त्यामुळे कदाचित विकासाचा शिवधनुष्य पेलणे अवघड होऊन बसले आहे.
आपण जन्माष्टमीच्या आणि गणेशोत्सवाचे हि राजकारण केले, ९ थर लावावे का ? हा प्रश्न हिंदू अस्मितेचा ठरवून त्याला जातीय रंग आणून त्यावरून राजकारण. किती थर लावतो ह्यापेक्षा नेमका जन्माष्टमी का साजरी करतो आणि ती गीता आपण जगतो का आणि तसे वागतो का ह्याच विचार का नाही होत?. हिंदू असण्याचा अभिमान बाळगायचा तर त्या आधी खरे  हिंदू तर होऊ आपण.  का कायमच कोणीतरी आपल्याला राजकारण आणि पैसे ह्या मध्ये मोजून भावनांशी खेळ करणार. थर लावा योग्य ती काळजी घ्या पण नेमके ह्या मागचे राजकारण समजून घ्या. ह्या दिवसात होणारा देवाच्या नावाखाली चालणार काळा बाजार , प्रचंड पैश्याची उलाढाल करता यावी म्हणून सुरु केलेलं हे भीषण रूप आणि ह्याला दिलेला जातीचा आणि धर्माचा रंग हे न कळण्याइतपत आपण आंधळे झालो आहोत का ? राजकारणी त्यांचे मतांचे राजकारण करतात आणि आपण केवळ बघत राहतो.
लोकमान्यांनी सुरु केलेला खरा गणेशोत्सव आता खरेच राहिला आहे का? त्याचा जो प्रामाणिक हेतू होता तो खरेच आता काळाआड गेला आहे. ह्या सर्व सणांना एक व्यावसायिक आणि राजकारणी रंग आला आहे..
आणि हा केवळ आपल्या मुळे आला आहे.  ह्यात त्या राजकारण्यांचा काही दोष नाही कारण ते त्यांचे खुर्चीचे राजकारण करत राहणार , त्यात आपण कितपत अडकायचे आणि त्याचा बळी व्हायचे हे आपल्या हातात आहे
आम्ही नेहमी म्हणतो कि अश्लील नाच , कर्णकर्कश्य गाणी हे आमच्या आराध्य बाप्पा समोर का लागतात नको लागायला , पण ह्या अश्याच मिरवणुकीला आम्ही गर्दी करतो, आमच्या घरातली तरुण मंडळी ह्या गाण्यांवर नाचतात.राजकारणी ह्या सगळ्या गोष्टींचा त्यांचा स्वार्था साठी उपयोग करून घेणारच. 
अशी अर्वाच्च गाणी आम्ही ऐकतो म्हणून ती प्रसिद्ध होतात आम्ही ऐकलेच नाही तर कोण कशाला तयार करेल अश्या प्रकारचे थोतांड.
आम्हला लोक हिंदू मुस्लिम वरून लढवतात आणि आम्ही लढतो . ज्या संस्कृतीसाठी आमचा जीव तुटतो ती अजून रसातळाला नेण्या साठी आम्हीच पुढाकार घेतो, ती टिकवण्यासाठी आम्ही असे किती आणि काय प्रयन्त करतो , आम्ही केवळ टीका करतो. आणि नंतर त्यालाच अप्रत्येक्ष पणे साथ देतो. 
लाखो रुपयांचा धंदा मंडळे करतात असे आम्ही म्हणतो पण हा पैसे त्यांचा कडे येतो कुठून आपल्या कडूनच ना , मग समजा आम्ही आमचा पैसे एखाद्या गरजूला दिला आणि मंडळांना त्यांचा धंद्यात मदत नाही केली तरी बाप्पा पावलाच कि
आम्ही दहीहंडी साठी कोट्यावधी रुपये खर्च  करतो पण ज्या कृष्णाने कर्मावर भर देऊन माणसात देव पहा म्हणले ते आम्ही ऎकत नाही
सर्वे भवन्तु सुखिनः
सर्वे संतू निरामयाः
असे आमच्या धर्मात सांगितले त्याचे खरेच पालन आम्ही करतो का ? खरेच आम्ही धर्म जाणून त्याचे रक्षण आणि प्रचार करतो का? मग हे थर लावून आणि अश्लील नाचगाणे करून आम्ही नेमका कोणता धर्म जपतो आहोत किंवा नेमक्या कोणत्या धर्माचा प्रचार करतो आहोत
ह्यातच एक बातमी आली ती म्हणजे रिक्षेवाले संपावर गेले का तर म्हणे काही व्यावसायिक टॅक्सी कंपन्या बाजारात आल्या आणि ह्यांचा धंदा बसला म्हणे , हे वाचायला जितके बालिश वाटते तितकेच ते आहे देखील
तुम्ही तुमचे कर्म ( हिंदू धर्मात सांगितल्या प्रमाणे ) चोख आणि प्रामाणिक पार पाडले तर तुमचे काम कोणी कसे हिरावून घेऊ शकेल. आपण आपले काम योग्य रित्या करत नाही म्हणून त्याचा फायदा दुसर्यांना मिळतो .
मागे हि असेच एक राजकारणी मराठीचा मुद्दा पुढे करून मतांची भीक मागत होते , अहो मला सांगा मराठी माणूस खरेच इतका कमकुवत कमजोर आहे का ? इतका कर्तृत्वान समाज खरेच त्याला अश्या गोष्टींची गरज आहे का ?
मराठी माणसाला कोणी प्रगती वाचून अडवले आहे का ? गुजराती, मारवाडी, सिंधी, बिहारी हे सर्व लोक जीवापाड कष्ट करतात आणि मग इथवर पोहचतात तुम्ही हि करा कोणी अडवले आहे ?
ह्यात केवळ गरीब लोकांचा बळी दिला जातो घाण राजकारण करून बलाढ्य लोक अजून  गब्बर होतात आणि समाजाचा आर्थिक आणि मानसिक दर्जा दुभंगला कि त्यावर स्वतःची भाकरी भाजतात.
लिहायला खूप आहे डोक्यात मनात , पण मित्रांनो इतकेच सांगेन , आपण सगळे मिळून नवीन समाज घडवू शकतो , आपल्याला केवळ ती जागरूकता आणायची आहे.
आपण ठरवूया आपल्या पासून सुरवात करूयात , "जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले" .. ह्या मार्गावर जायचे, बाबा बुवा धर्म ह्यात अडकून न बसता माणसात देव पाहायचा, जन जागृती करायची , मदत करायची, कष्ट करायचे ,स्वतः प्रामाणिक राहून लोकांना  तसे करायला प्रवृत्त करायचे .
पैसे देव्हाऱ्यात टाकण्याऐवजी एखाद्या गरीबाच्या घरात एक वेळचे जेवण मिळेल ह्याची सोय  करूयात , देव माणसात बघू तिथेच तो भेटेल आपल्याला.
खऱ्या अर्थाने हिंदू धर्म साकार करू प्रस्तापित करू. गीतेत सांगितल्या प्रमाणे ,  "कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन" ह्या मार्गावर चालून समाजाचा स्वतःचा आणि मानवजातीचा उद्धार करू .
असा सक्षम समाज समाज उभा राहिला तर प्रगती आणि विकास असा कितीसा दूर आहे.

शुभम भवतु
अद्वैत













Thursday, July 21, 2016


पुरुष - सुसंस्कृत का विकृत

विषया वरुन आशय कळला असेलच.
परवा असेच एका मोठ्या मॉल मध्ये काही खरेदी करायला गेलो, एक प्रसंग खुप विचार करायला लावून गेला म्हणून ह्या लिखाणाचे प्रयोजन. एक पुरुष त्याच्या कुटुंबा बरोबर खरेदी करायला  आला होता ,तिथे काही सेल्स गर्ल्स होत्या लहान होत्या  वयाने उपजिवीके साठी नौकरी करत होत्या. हा पुरुष त्यांच्या बाह्य अंगाकडे खूप वाईट नजरेने पाहत होता स्वतःच्या बायकोला खरेदी मध्ये गुंतवून. ह्या पुरुषाला बेदम मारावे का त्याची कीव करावी हेच कळत नव्हते. ज्याला आपण उचभ्रु शिकलेला चांगल्या घरातला वगैरे म्हणतो अश्या पुरुषाचा हा भयावह चेहरा.
खूप प्रश्न मनात चाटून गेले त्याने असे का केले असेल ? त्याची अशी इतकी गलिच्छ मानसिकता का असेल ? आणि बरेच काही , त्या बिचार्या मुलींचे काय चुकले लहान होत्या गरिबीचे चटके सोसत काही पैसे कमावत होत्या कोणताही आधार नाही त्यांचे कोणी ऐकणार नाही , म्हणून का हे लोक असे शेफ़ारले आहेत.
आपल्या देशात स्त्री ला अनन्य साधारण महत्त्व आहे आणि हीच स्त्री आजकाल अशी इतकी असुरक्षित आहे
का आपल्या कडे तिला हवा तसा  सन्मान मिळत नाही ? का ही पुरुषांची अशी वासनिक मानसिकता पदोपदी स्त्रियांना सहन करावी लागते.
एखाद्या स्त्री चा पदर पडला तर माझी बहीण किंवा आई ह्या नात्याने तिला तो ठीक करायला सांगणे हा सुसंकृत शिष्टाचार , त्या कडे गलिच्छ नजरेने बघणे म्हणजे केवळ संस्कारांचा अभाव.
आजकाल तर मैत्रीच्या पवित्र नात्यात ही वासना आणि स्वार्थ दडला आहे , एखादी स्त्री समजा एखादया पुरुषाकडे आधार किंवा मदत मागते तर ही संधी नाही तर जवाबदारी आहे , त्याचा गैरफायदा घेणे म्हणजे अक्षम्य पाप आहे .
स्त्री पुरुष समानता आपण म्हणतो, तसे नौकऱ्या ही मिळतात माता भगिनी नित्य नियमाने त्यांचे कर्तव्य पूर्ण करतात , पण तिथे ही त्या सुरक्षित नाहीत.  पन्नाशीचा एखादा वरिष्ठ अगदी नवीन रुजू झालेल्या एखाद्या विशीतल्या तरुणीवर वाईट नजर ठेऊन तिचा गैरफायदा घेण्याच्या प्रयत्नात असतो . ह्या अश्या विकृतीला काय म्हणावे नेमके.
स्त्री साठी तिच्या आजूबाजूचे पुरुष मग ते वडील असो भाऊ असो किंवा मित्र असो विश्वासातले हक्काचे असतात तिथे ही तिला आज धोका अविश्वास ह्याला सामोरे जावे लागते आहे
का नाही प्रत्येक आई बहीण तिच्या मुलाला किंवा भावाला असे तयार करत की तो परस्त्री कडे माता भगिनी ह्याच रूपात बघेल आणि त्यांची जवाबदारी घेऊन त्यांना त्यांचा सन्मानाने वागवेल. शिवाजी निर्माण होण्यासाठी पाहिले जिजाऊ तर जन्माला आल्या पाहिजेत.
मला मान्य आहे ह्या समाजात जसे वाईट पुरुष तसे काही वाईट स्त्रिया ही आहेत , व्यभिचारी किंवा विश्वासघात करणाऱ्या. खोटे आणि अप्रामाणिक वागणाऱ्या. पण प्रत्येक समाजात चांगले वाईट लोक किंवा अनुभव असतात , आपण स्वतःला किती सुसंकृत प्रामाणिक आणि खरे करू शकू ह्यावर त्या समाजाचा समतोल अवलंबून असतो
परस्त्री माते सामान हे काय केवळ पुस्तकातच राहणार का ? आपली मैत्रीण, सहकर्मचारी , बहीण , बायको , आई अश्या कित्येक स्वरूपात स्त्रिया आपल्या आजूबाजूला वावरत असतात , त्यांचा सन्मान करणे आणि त्यांना सुरक्षिततेची भावना देणे हे आपले आद्य कर्तव्य आहे.
समाज खराब आहे अलीकडे सगळे वाईट होत चालले आहे ,हे घरी बसून म्हणण्या पेक्षा स्वतःमध्ये आणि आजूबाजूच्या वातावरणा मध्ये बदल घडवणे किंवा प्रभोधन करणे हे आपलेच काम आहे कोणी बाहेरचा येऊन आपला ढासळलेला समाज नीट नाही करू शकणार.
प्रत्येक पुरुषाने स्वतःला सुसंस्कृत करायला हवे विकृत नव्हे , स्त्री ही आपल्या आयुष्याची सहचारिणी किंवा अविभाज्य घटक आहे ह्या दृष्टिकोनातून तिच्या कडे पाहायला हवे . ती उपभोगाची किंवा वापरण्याची गोष्ट नाही हे प्रत्येक पुरुषाने स्वतःला आणि दुसऱ्याला ही सांगायला हवे आणि तसे करायला भाग पडायला हवे.

आपण सगळे मिळून महारांजाच्या सुराज्य आणि स्वराज्याचे स्वप्न खऱ्या अर्थाने साकार करूयात.

शुभम भवतु

अद्वैत












Monday, July 4, 2016

प्रेम असेही असते

तुझे कमी माझे जास्त
ऐसे काही नसते
जे ह्रदयात खोलवर पोहचते
तेच खरे प्रेम असते

कधी तुझे कधी माझे
सोडून द्यायचे असते
संवादातातुन सुसंवादाता कड़े
नाते नियमित न्यायचे असते

मनातून प्रामाणिकपणे
बंध जोपासायचे असते
आपल्यातले  'मि' पण सोडून 
एकमेकांसाठी जगायचे असते

ऋणानुबन्ध आधीच जुळतात
आपण फक्त ते जपायचे
चूका स्वाहा करुन
एकमेकांचे गुण दोष साम्भाळायचे

शुभम भवतु

अद्वैत  
 

Sunday, April 17, 2016

अध्यात्म का व्यवसाय

इतक्यातच एक बातमी वाचली , भारत सरकारने ह्या वर्षीचे 'पद्म' पुरस्कार जाहीर केले , त्यात जशी नेहमी काही नावे खटकतात तसे ह्या वेळीही एक नाव खटकले . कोणी एका श्री श्री नावाच्या माणसाचे ज्याला अध्यात्मिक गुरु म्हणून सन्मानित करण्यात आले होते.
नेहमी सारखे बरेच सारे प्रश्न आणि शंका मनात येउन गेल्या,ह्या सगळ्यावर हसायचे का रागवायचे ते कळत नव्हते.
आपल्या कडे संतांची किंवा गुरु शिष्य संस्कृतीची खूप मोठी परंपरा आहे. पण हे जे काही सध्या चालले आहे ते मात्र ढोंगी पणा आणि व्यवसाय ह्या पलीकडे नक्कीच दुसरे काही नाही.
मी जे लहान पणा पासून वाचत किंवा ऐकत आलो , ते संत तुकाराम , द्यानेश्वर , गजानन महाराज आणि बरेच खरे संत ह्यांनी समाजप्रबोधनासाठी कधी पैसे घेतले नाही मोठे मोठे आश्रम बांधले नाहीत. तुकारामांनी ओव्या रचल्या त्यासाठी मानधन नाही घेतले किंवा ते लोकांपर्यंत पोहाचावाण्या साठी अजून वेगळे काही पर्यंत केले नाही. मोठे क्लासेस नाही काढले. लोकांना आर्ट ऑफ लिविंग हे सोप्या शब्दात आणि विनामूल्य शिकवले.
कोणा एका उचाभ्रू समाजाचा भाग न राहता तळागाळा पर्यंत पोहचवण्याचा ह्या सर्वांनी पर्यंत केला. ह्याला आजवर आम्ही संत म्हणालो स्वतःचा विचार न करता समाजाचा विचार करणे , मोठ्या महालात राहून कोट्यावधी रुपये कमावून समाज सुधारणा होते ? आश्यर्य आहे म्हणा.
बाबा आमटे सारख्या लोकांना करावी लागली का हो कसली जाहिरात कि आजपासून आम्ही हे असे काम करणार आहोत सगळे या पैसे द्या मग आम्ही करु . त्यांनी कित्येक वर्षे स्वतःच्या जीवावर गरजू लोकांसाठी स्वतःला अक्षरश अर्पण केले , विदेश वार्या करून समाज नाही सुधारला.
माझा त्यांच्या व्यवसायावर आक्षेप नाही कारण प्रत्येक जण पैसा कमावतो, फक्त आक्षेप हा आहे कि तुम्ही सर्वाना सांगा कि आम्ही हे भावनेचे भांडवल आमच्या स्वार्था साठी करत आहोत ह्यात धर्म अध्यात्म असे काही नाही  , आम्हाला काही नको आणि आम्ही समाजासाठी काही करतो हि भावनाच चुकीची आहे , कारण असे होताना दिसत नाही . सगळा केवळ व्यवसाय .
आजच्या धकाधकीच्या जीवनात लोकांना असंख्य अडचणी दुखः असतात , आणि म्हणून ते कोणाचा किंवा कुठलातरी आधार घेतात, त्यांच्या अश्या असह्यातेचा फायदा घेऊन स्वतःची पोट भाराने हे कसले गुरु , हे तर पक्के व्यावसायिक आजकाल कोणी हि उठते सद्गुरु होते गुरु होते , अश्या बाबा बुवा मुळेच समाज प्रगती करू शकत नाही , त्यांचे ह्या समाजाला अजून स्वतःवर अवलंबित करायचे आणि त्यांचे विचार छाटून टाकायचे आणि स्वतःचे ध्येय पूर्ण करायचे हेच उदिष्ट आहे
आणि अश्या माणसांचा आपण सत्कार करणार आहोत ? किती दिवस आपण अजून ह्या समाजाला असेच खाली खेचणार आहोत
माणूस आणि माणुसकी हाच एक धर्म आणि हीच एक जात आणि त्याचा सन्मान,प्रगती साठी माणुसकी साठी जगा , ह्या अश्या बिन भांडवलाच्या धंद्याला कितपत पाणी घालायचे हे आपल्या हातात आहे. आपले विचार आपली सदसद्विवेकबुद्धी वापरा. आपले हजारो वर्षापासुनचे अफाट साहित्य आहे त्याचे अध्ययन करा अश्या ढोंगी बाबांची गरज भासणार नाही.
स्वतःवर विश्वास ठेवा आपल्या मातापित्यांचा आशीर्वाद घ्या , नक्कीच सगळे मार्ग सापडतील. कोणालाही स्वतःच्या अडचणीचे भांडवल करून त्यावर पैसे कमवू देऊ नका कष्टाचा पैसा असा व्यर्थ घालवू नका. कोणी म्हणते म्हणून काही करू नका त्याचा स्वतः उठून विचार करा अंध अनुकरण करू नका , नुकसान फक्त आपलेच आहे.
समाजाच्या प्रगती साठी एकत्र येवूयात . आपापसातले मतभेद जात धर्म ह्या पलीकडे जाऊन सक्षम समाज बनवूया , मित्रांनो प्रगतीला गुरु बनवूया सरावाचा विकास करून एकत्र पुढे जाऊयात .

शुभं भवतु

अद्वैत